Wednesday, March 27, 2013

बकलावा

बकलावा हा नक्की कुठून आलेला पदार्थ आहे याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. मध्यपूर्वेतील देशांना बाकलावा हा त्यांचा पदार्थ वाटतो. पण  असूर त्याचे  खर्‍या अर्थी त्याचे मालक आहेत. सणासुदीला हा पदार्थ करण्याची प्रथा होती. श्रीमंताची चैन म्हणून बाकलावाची ओळखला जाई.

नंतर हळूहळू मुळ पाककृतीत थोडा थोडा बदल होत गेला. आता ग्रीक आणि टर्कीश दोघंही बाकलावावर आपला हक्क सांगतात. टर्कीमध्ये तर म्हण प्रचलित आहे, "बकलावा रोज रोज खाण्याइतकी श्रीमंत नाही आपल्याकडे."

 फिलो डोव हा  शब्द  पान या ग्रीक शब्दापासून आला आहे. पानासारखं पातळ या अर्थी.

 साहित्य:  
१ पाकिट - (16 ounce) फिलो डोव (phyllo dough)  त्यातील एक गुंडाळी (Roll) (कोणत्याही दुकानात फ्रिझर भागात मिळतं)
३ वाट्या पिस्ते, अक्रोड, बदाम, पिकॅन्स (आवडीप्रमाणे एकच किंवा एकत्रित)
१ बटर स्टिक
१ चमचा दालचिनी कुटून
१ कप पाणी
५ चमचे साखर
१ चमचा व्हॅनिला अर्क/ वेलची पावडर
१/४ कप मध
६ लवंगा
   लिंबू
  किंचित मीठ

कृती:
फिलो डो पाकिटावरील सूचनेप्रमाणे बाहेर काढून ठेवा. (रात्रभर फ्रिजमध्ये)
अक्रोड, बदाम, पिस्ते कॉफी ग्राईंडर मधून सरबरीत करा. बारीक बारीक तुकडे रहायला हवेत. दालचिनी आणि ३ लवंगांची पावडर घालून मिश्रण एकत्र करा.
बटर स्टिक मायक्रोव्हे्वेबल भाड्यांत घालून १ मिनिटं गरम करा. तूप पातळ व्हायला पाहिजे.
फिलो डो पाकिटातून काढून सुकू नये म्हणून ओलसर फडक्याने झाकून ठेवा.
बेकिंग ट्रे मध्ये फिलो डोच्या चार पट्ट्या घाला. ब्रशने तूप लावा. एक ते दोन चमचे अक्रोड, बदाम, पिस्ता, पिकॅनचं मिश्रण फिलो डोच्या पट्ट्या वर पसरा.
एकू्ण आठ थर व्हायला पाहिजेत. पट्ट्या, बटर, मिश्रण असा प्रत्येकवेळेला क्रम ठेवा.
शेवटी सर्वात ८ पट्ट्या असायला हव्यात.
धारदार सुरीने चौकोनी किंवा पाहिजे त्या आकारात तुकडे कापा. (चित्र पहा)
३० ते ४० मिनिटं किंवा बाकलावाचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत ३५० डिग्री फॅरेनहाईट्वर भाजा.

बकलावा तयार होईपर्यंत साखर आणि पाणी घालून गरम करा. साखर विरघळली की व्हॅनिला आणि मध घाला, लिंबाचे एक दोन थेंब आणि अगदी किंचिंत मीठ. २० मिनिटं मंद आचेवर राहू द्या.

बकलावा झाला की ओव्हनमधून काढून ताबडतोब तयार झालेला मधाचा रस चमच्या चमच्याने त्यावर घाला. थंड होऊ द्या. बेकिंग ट्रे झाकू नका. थंड झाल्यावर बाकलावाचा आस्वाद घ्या.

साधारण 24 बकलावा तयार होतात.