Wednesday, March 26, 2014

फहिता


हा टेक्स मेक्स पद्धतीचा प्रकार आहे. म्हणजे ग्रील्ड चिकन किंवा भाज्या  टॉरटियावर पसरुन खाणे. करायला सोपा आणि
चविष्ट.

साहित्य:
६ - हिरवे टॉमेटो सालासकट (ग्रीन टोमाटियो)
१ - सेरानो किंवा हॅलॅपेन्यो मिरची
२ - लसूण पाकळ्या
८ टॉरटीय़ा (ग्रोसरी स्टोअर्स मध्ये भाज्यांच्या विभागात/ मेक्सिकन विभागातही)
१/४ कप श्रेडेड चीज (ऐच्छीक)
४ चमचे सावर क्रिम (ऐच्छीक)
१ भोपळी मिरची
१ कांदा
१ पॅक बटण मशरुम

कृती:
सालसा (चटणी)
हिरवे टॉमेटो १ चमचा ऑलिव्ह ऑईल लावून ओव्हनमध्ये सालासकट ब्रॉईल करा. सालांवर अर्धवट काळे डाग पडतील इतके भाजले गेले पाहिजेत. (चित्रातले जास्त भाजले गेले आहेत.) दोन दोन मिनिटांनी परतून साधारण ८ मिनिटं लागतात.
गार झाले की मिक्सरमध्ये सालं काढून, लसूण पाकळ्यांबरोबर भरड वाटा.
चवीप्रमाणे मीठ घाला.

भाज्या:
भोपळी मिरची, कांदा उभे पातळ चिरा. मशरुम न चिरताच वापरले तरी चालतील.
थोड्या तेलावर एकेक करुन परता.
टॉरटीया मायक्रोव्हेवमध्ये ३० सेंकद गरम करा. पेपरटॉवेल किंवा घट्ट झाकणाच्या मायक्रोव्हेवेबल भाड्यांत घालून गरम करावं लागेल हे लक्षात ठेवा, नाहीतर कडक होतील.

गरम केलेल्या टॉरटीयावर सालसा, भाज्या, चीज पसरुन गुंडाळी करुन आस्वाद घ्या. वर सावर क्रिमही घेवू शकता. मासांहारी पाहिजे तर भाज्यांऐवजी किंवा बरोबर चिकन वापरु शकता.