Wednesday, April 24, 2013

ग्रील्ड मशरुम पास्ता

साहित्य:
१ - पास्ता पाकिट
१ - डबा (कॅन) क्रिम ऑफ मशरुम सॉस
किसलेलं (श्रेडेड) चीज भुरभुरवून टाकण्यासाठी
७-८ -  मशरुम चिरुन, ब्रोकोलीची फुलं मुठभर, १ भोपळी मिरची उभट        चिरुन किंवा
१ कप -   कोणत्याही फ्रोझन भाज्या

कृती:
पास्ता उकळत्या पाण्यात घालून ९ ते १२  मिनिटं किंवा मऊसर होईपर्यंत शिजवा किंवा पाकिटावर दिलेल्या सूचनेप्रमाणे
चाळणीतून गाळा आणि गार पाण्याखाली धरा. पाणी निथळून घ्या.
पातेल्यात एक चमचा तेल गरम करुन चिरलेल्या भाज्या दोन मिनिटं परता त्यात कॅनमधील अर्ध मशरुम सॉस थोडं पाणी घालून घाला. चवीपुरते मीठ घालून सगळं नीट परता आणि पास्ता घालून चांगला गरम करा. यामध्ये भारतीय चव आणायची असेल तर चाट मसाला, पाव भाजी मसाला एक चमचा घातला तर चांगला लागतो.
बेंकिंग ट्रे मध्ये वर तयार झालेलं मिश्रण पसरा. किसलेले चीज त्यावर पसरा. ओव्हन ब्रॉईलवर लावा. पास्ता असलेला बेकिंग ट्रे  ब्रॉयलरखाली तीन ते चार मिनिटं ठेवा.
बाहेर काढून गरम गरम खा.
Whole Grain Penne Pasta


Tuesday, April 16, 2013

पेअर आणि अननस क्रंच

Tropical Pineapple Crisp Recipe
साहित्य :
२९ औंस कॅन - पायनॅपलचे तुकडे
२० औंस कॅन - पेअर
१ - केक मिक्स पुडा
१ - बटर स्टिक मुठभर बदाम किंवा पिकॅन्स
 आईस्क्रिम

कृती:
अननसाचे तुकडे आणखी बारीक करा.
पेअरचेही बारीक तुकडे करा.
दोन्ही एकत्र करुन बेकींग ट्रे मध्ये पसरा
ओव्हन ३५० डिग्रीवर चालू करा.
डब्यामधला रस गाळून घ्या. अननस आणि पेअर गाळून जो रस येतो त्यातून दोन्हीतील अननसाचा जास्त (१/२)आणि थोडा पेअरचा रस (१/४) घ्या. तो ५ मिनिटं उकळा. नंतर एक चमचा कॉर्नस्टार्च गार पाण्यात विरघळवून ते उकळत असलेल्या मिश्रणात घाला. रस घट्ट होत जाईल.
 गरम गरम घट्ट रस ट्रे मध्ये पसरलेल्या फळांच्या तुकड्यावर सर्वत्र पसरा.
बटर मायक्रोव्हेवमध्ये १ मिनिटं गरम करा. पूर्ण वितळलं पाहिजे. त्यामध्ये केक मिक्स आणि बदाम/पिकॅन्स घालून नीट एकत्र करा. मिश्रण जाडं भरडं राहू द्या.
 हे मिश्रण फळांच्या थरावर व्यवस्थित पसरा आणि ३५० डिग्री सेल्सिअसवर ३० मिनिटं किंवा वरचा थर हलका तपकीरी होईपर्यंत ओव्हनमध्ये भाजा.
 बाहेर काढून लगेचच तुकडे काढून त्यावर आईस्क्रिम घालून गरम गरम खायला द्या.







Monday, April 15, 2013

ॲपल सॉसचं पन्हं

कैरीऐवजी ॲपल सॉस वापरलं आहे हे मुद्दाम सांगितल्याशिवाय या पन्ह्यात  कळत नाही

साहित्य: 
 ४८ औंस ॲपल सॉस बाटली
१/४ वाटी गुळ
१/२ चमचा मीठ
१ चमचा वेलची पावडर
२ चमचे लिंबू रस
कृती:
ॲपल सॉस स्लो कुकरमध्ये किंवा गॅसवर ३० मिनिटं मध्यम आचेवर उकळा. उकळत असतानाच गुळ घाला. गुळ घालताना आधी निम्माच घालून चव पाहून घ्यावी अजून गोड पाहिजे असेल तर उरलेला गुळ घालावा. अधून मधून ढवळायला विसरु नका. साधारण बाजूने तपकिरी रंग दिसायला लागला की गॅस बंद करा.

एक चमचा वेलची पावडर, चवीपुरतं मीठ, लिंबाचा रस दोन तीन चमचे, (आणखी गोड हवं असेल तर गुळ न घालता  साखर घाला) आणि तुम्हाला जितकं  पन्हं पातळ पाहिजे त्या प्रमाणाने  पाणी घाला. गार झाल्यावर थंडगार होण्यासाठी  फ्रिजमध्ये ठेवा.

ॲपल सॉसची ४८ औंसची बाटली वापरली तर २० - २५ ग्लास पन्हं तयार होतं. ॲपल सॉस दुकानात सॉस/केचप ठेवलेल्या भागात/रांगेत मिळतं.


                                         

Thursday, April 4, 2013

स्पिनॅच डिप


.
डिप किंवा सालसा म्हटलं तर आपल्या चटण्या आणि कोशींबीरीच. चव अर्थात वेगळी पण हेतू तोच. मात्र
डिप या प्रकाराचा कागदोपत्री पुरावा १९६० नंतर आढळतो.

लिप्टन कंपनीची इंन्स्टंट सुप्स बाजारात आली, त्याचबरोबर त्याचा वापर करुन कोणते पदार्थ करता येईल याची माहिती कंपनीने दिली. त्यात एक होतं, डिप.

टी. व्ही. समोर बसून निरनिराळे ’खेळ’ पाहता पाहता आता डिप्सवर ताव मारला जाऊ लागला. त्यातलंच हे स्पिनॅच डिप.
ही पाककृती Knorr च्या व्हेजिटेबल मिक्सच्या पाकिटावर आहेच, पण माहित नसेल तर आपण  ते पाकिट घेत नाही त्यामुळे खूपजणांनी ही पाककृती करुन पाहिलेली नसते. मी यात केलेला बदल म्हणजे मेयॉनीज ऐवजी ग्रीक योगर्ट (श्रीखंड बनवताना करतो तो चक्का) चा आणि सॉवर क्रिम ऐवजी कॉटेज चीजचा (पनीर किसून किंवा कुस्करुन) वापर.  मुळ पाककृती उत्तमच लागते पण अंडं नको असेल तर ग्रीक योगर्ट हा उत्तम पर्याय आहे.

साहित्य: 
1 पॅक (10 oz.) फ्रोझन किंवा ताजा पालक
1 डबा (16 oz.) सॉवर क्रिम किंवा कॉटेज चीज (दुकानात दुध, दही असतं त्या विभागात मिळेल)
1 कप मेयॉनीज, (अंडं चालत नसेल तर ग्रीक योगर्ट वापरा)
1 पॅक Knorr चं व्हेजिटेबल मिक्स
1 कॅन (8 oz.) वॉटर चेस्टनट्स (ऐच्छिक) याऐवजी बदाम पण वापरता येतील
3 कांद्यांच्या पाती

कृती:
पालक मायक्रोव्हेव मध्ये ३ ते ५ मिनिटं शिजवून घ्या. गार झाल्यावर हाताने घट्ट दाबून पाणी काढून टाका. नंतर बारीक चिरुन घ्या.
कांदा पात, चेस्टनट्स बारीक चिरुन वरील सगळे घटक व्यवस्थित एकत्र करा. कमीत कमी दोन तास किंवा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा.
चित्रात दाखवल्याप्रमाणे सॉवर डोवचा किंवा कोणताही गोल ब्रेड कोरुन खोलगट खड्डा तयार करा. मध्ये किंवा स्वतंत्र भाड्यांत काढून मित्र मंडळी बरोबर गप्पा मारत सेलरी, गाजर किंवा टॉरटीया चिप्स डिपमध्ये बुडवून खाण्याची लज्जत औरच.

Plain

Daisy Pure & Natural Sour Cream 8-oz.